Yavat: संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका; यवतमधील तणावानंतर पुणे पोलिस अलर्ट मोडवर, पाहा VIDEO
सागर आव्हाड, पुणे
पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी यवतमधील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर काही तासांतच म्हणजे दुपारी १२ वाजल्यानंतर यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आणि परिसरात तणाव वाढू लागला. दोन गट आमने सामने आले. त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. यवतमधील तणावानंतर पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. संयम बाळगा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यवतमध्ये यापूर्वीच २६ जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच अवघ्या काही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने वातावरण आणखी तापले आहे. सदर आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतमधील सहकार नगर या भागातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्या युवकाच्या घरावर दगडफेक आणि तोडफोड केली. काही काळासाठी परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, वेळेवर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, तरुणाच्या घराची मोठी हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने बंदोबस्त वाढवला आहे. या संतप्त जमावाने यवत गावातील काही दुचाकींची तोडफोड करत पेटवून दिले. रस्त्यावर टायर जाळले. यामुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाकडून यवत परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास न ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. २६ जुलै रोजी घडलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पुतळा विटंबनेच्या घटनेमुळे यवत परिसर आधीच संवेदनशील बनला आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण पूर्णतः तणावपूर्ण बनले आहे. पोलिस आता संबंधित पोस्ट करणाऱ्या युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करत असून, सोशल मीडियावर कोणतीही चिथावणीखोर माहिती प्रसारित होऊ नये यासाठी सायबर सेलसह विशेष पथक कार्यरत आहे.
यवतच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, 'सदर प्रकार अत्यंत गंभीर असून कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी..' सद्यस्थितीत यवत गावात शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि कोणत्याही अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.