खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने पुण्याच्या पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न सुटला
पानशेत, वरसगाव, पवना, टेमघर आणि मुळशी धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ
हवामान विभागाने ३० जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच आता पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पाणीटंचाईच टेन्शन मिटलं आहे. २९ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून पानशेत, वरसगाव आणि पवना धरणेही पूर्ण क्षमतेच्या अगदी जवळ पोहोचली आहेत. वाढत्या पाणीसाठ्यामुळे प्रशासनाने धरणांमधून नियंत्रित पाणी सोडण्यास सुरुवात केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या माहितीनुसार, खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा सोमवारी ९४.११ टक्के होता, तो वाढून बुधवारी ९८.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वरसगाव धरण ९१.७० टक्के भरले असून पवना धरणात ९६.६३ टक्के, टेमघर धरणात ८०.०३ टक्के आणि मुळशी धरणात ८६.५१ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
धरणांमध्ये सातत्याने पाणी येत असल्याने पानशेत धरणातून नदीपात्रात १,७१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे मुठा नदीत नियंत्रित पद्धतीने सुमारे ४,७०८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ३० जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उद्या पासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी धरणांतील पाणीसाठा समाधानकारक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम घाट परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे पुण्याच्या जलसाठ्याला मोठा आधार मिळाला असून आगामी काही महिन्यांसाठी शहराचा पाणीपुरवठा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.