

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांकडून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर
एकटेपणा आणि इंटरनेटचा वाढता प्रभाव मुख्य कारण
मानसिक आरोग्य आणि नैराश्याचा मोठा परिणाम
पुणे शहरात गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. ६० वर्षे वय ओलांडल्यानंतर ज्येष्ठांच्या मानसिकतेत आणि वर्तणुकीत होणाऱ्या बदलांमागे नेमकी काय कारणे आहेत, यावर आरोग्य तज्ज्ञांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे.
तज्ज्ञांच्या मते, ६० वर्षांनंतर अनेक नागरिक नोकरीतून निवृत्त होतात. निवृत्तीनंतर येणारा 'एकटेपणा' हे या प्रवृत्तीमागील एक प्रमुख कारण आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोबाईलचा वाढता वापर, पॉर्नोग्राफी, डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियामुळे ज्येष्ठांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. तसेच, बदलत्या काळानुसार जुनी सामाजिक मूल्ये आणि कौटुंबिक बंधने कमी होत चालल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या वयानुसार निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यातून येणारे नैराश्य यांचाही ज्येष्ठांच्या वर्तनाशी जवळचा संबंध असतो. अनेकदा आपली मते किंवा भावना मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक चुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता असते.
एक प्रभावी उपाय या समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञांनी 'सोशलायझेशन' (सामाजिकीकरण) वर भर दिला आहे. पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर दिसणारे 'मॉर्निंग वॉक ग्रुप्स' किंवा 'ज्येष्ठ नागरिक संघ' हे एकटेपणा घालवण्यासाठी उत्तम माध्यम आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारणे, मनातील गोष्टी शेअर करणे आणि एकमेकांना आधार देणे यामुळे मनावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
केवळ घराबाहेरच नाही, तर घरातही नातेवाईकांनी आणि मुलांनी ज्येष्ठांशी सुसंवाद राखणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना दिला जाणारा वेळ आणि प्रेम त्यांना अशा नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर ठेवू शकते, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.