
सध्या राज्यचं वातावरण वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे तापलंय. या घटनेनंतर अजूनही राज्यातील विविध भागांमधून सुनेच्या छळाची बातमी कानी पडत आहे. या प्रकरणामुळे औंधमधील गायकवाड कुटुंबाच्या क्रूर कहाणीची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे.
संपत्ती, अमाप हुंडा आणि सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, मुळशीत घडलेलं असंच काहीसं प्रकरण काही वर्षांपूर्वी औंधमध्ये घडलं होतं. या प्रकरणी त्या पीडित सुनेचा लढा अजूनही सुरूच आहे.
ही कहाणी आहे औंधमधील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबाची. गायकवाड कुटुंबातील सुनेला अघोरी प्रथा, शारीरिक आणि मानसिक छळाचा भयंकर सामना करावा लागला होता.
२०१७ साली पुण्यात दिमाखदार लग्न सोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्यात राजकीय नेत्यांसह विविध बड्या उद्योगपतींनी हजेरी लावली होती. भव्य लग्नसोहळ्यानंतर काही महिन्यांतच गायकवाड कुटुंबाचं भयानक रूप समोर आलं. ज्योतिषांच्या सांगण्यावरून सुनेचा छळ सुरू झाला. पती गणेश गायकवाड याने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार औंध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५.४८ कोटींचा ऐवज जप्त केला होता. यामध्ये रोल्स रॉयस, मर्सिडिझ, रेंज रोवर, पजेरो अशा आलिशान गाड्यांचा समावेश होता. केवळ पतीच नाही, तर दोन नणंदांनी सुद्धा सुनेवर छळ केला. सोनाली गवारे आणि दीप पवार या नणंदांनी मेलेल्या व्यक्तीची राख वस्त्रगाळ करून पिण्यास लावणे, अशा अमानवी अत्याचारांची परिसीमा गाठली होती.
नानासाहेब गायकवाड यांचा मुलगा गणेश गायकवाड याला आमदार व्हायचं होतं. ज्योतिषीच्या सांगण्यावरून गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ करण्यास सुरूवात केली. ज्योतिष येमुलने त्याला सांगितलं की, "तुझी पत्नी अवदसा आहे. पांढऱ्या पायांची आहे", असं त्याला सांगण्यात आलं होतं. तसेच बायकोला काडीमोड दे, असा सल्लाही ज्योतिषीने दिला होता.
'सुनेची जन्मवेळ चुकीची आहे तुझी ही बायको अशीच राहिली तर, तू कधी आमदार होणार नाही. मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल', असे पीडितेच्या पतीला सांगितले होते.
त्यानंतर सुनेवर लिंबू ओवाळून टाकणे, अनैसर्गिक अत्याचार करणे, ठार मारण्याचा प्रयत्न ही कृत्यं एकामागोमाग घडली. या प्रकरणाला कंटाळून तिने अखेर पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
गणेश गायकवाड कोण?
नानासाहेब गायकवाड हे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मावस भाऊ आहेत. तर, गणेश गायकवाड मोठे उद्योजक असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात असलेल्या मालमत्तेमधून त्याला दरमहा कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.
साहसी सुनेचा लढा
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेल्या सुनेने न्यायासाठी लढा दिला. ती आजही सासरीच राहून आपल्या मुलाचं पालन करते आहे. तीन वेळा MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल झालेलं गायकवाड कुटुंब आजही जेलमध्ये आहे. मात्र धमक्यांचे सत्र थांबलेलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.