

‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष मा. प्रतापराव पवार यांचे वर्णन व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून करावे लागेल. एखादा उद्योजक आयुष्यात उद्योग-व्यवसायांसोबत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतो याचे पवारसाहेब मूर्तिमंत उदाहरण आहेत. वक्तशीरपणा, गुणग्राहकता, संवेदनशीलता, निर्णयातील स्पष्टता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. सतत नाविन्याचा ध्यास त्यांना असतो. आपण जे पाहिले, अनुभवले ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची त्यांची तळमळ थक्क करणारी आहे.
पवार साहेबांचे प्राथमिक शिक्षण बारामतीमध्ये झाले. नंतर ते प्रतिष्ठित बिट्स पिलानीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी गेले. आपल्या बंधूंसोबत त्यांनी फाउंड्री व केमिकल्सच्या व्यवसायाचा विस्तार केला. ऐंशीच्या दशकात ते वृत्तपत्र व्यवसायात आले. नानासाहेब परुळेकर यांच्या वैचारिक चौकटीला धक्का न लावता त्यांनी ‘सकाळ’चा खप आणि लोकप्रिया आणि विश्वासाहर्ता वाढवली. ‘सकाळ’मध्ये ते ‘पीजीपी’ या नावाने ओळखले जातात. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यात त्यांची प्रगल्भता आहे.
अनेकांचा असा गैरसमज होतो की त्यांचे ज्येष्ठ बंधू शरद पवार यांच्यामुळे ते उद्योजक म्हणून यशस्वी ठरले. पवारसाहेब ६७-६८ मध्ये राजकारणात आले. त्या आधीपासून प्रतापराव सर उद्योगात होते व देशातील अनेक प्रतिष्ठित कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. तसेच पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा तेव्हापासून संबंध होता. आज देशातील नामवंत उद्योजकांमध्ये त्यांची गणती होते. व्यवसाय करताना त्यांनी अनेक चॅरिटेबल ट्रस्ट पुनर्जीवित केले.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीओईपी) कायापालट त्यांनी केला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्ष राहिले आहेत. ही संस्था वाढवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. तरुण पिढीने उद्योजकतेकडे वळली पाहिजे म्हणून ते सतत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यांच्या उद्योजकतेला सामाजिकतेची जोड आहे. हे फार दूर्मीळ आहे. पिंपरी चिंचवड युनव्हर्सिटीच्या (PCU) गव्हर्निंग बॉडीमध्ये ते इंडस्ट्री एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत.
उच्चशिक्षणामध्ये उद्योग आधारित कौशल्य, संशोधन आणि अकॅडमी-इंडस्ट्रीमधील अंतर कमी करण्यावर त्यांचा असलेला भर आमच्या संस्थेला खूप उपयुक्त ठरतो. पवार साहेब वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी झटणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणासाठी चाललेल्या संस्थांसाठी नेहमी कॅटालिस्ट म्हणून ताकदीने उभे असतात. सकाळ इंडिया फाउंडेशन, विद्यार्थी साहाय्यक समिती, अंधशाळा अशा अनेक संस्था आहेत.
पुण्यातील जोशी हॉस्पिटल व रत्ना मेमोरियल हॉस्पिटलच्या जनक संस्थेचे म्हणजे महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनशी त्यांचा गेली अनेक दशके विश्वस्त आणि अध्यक्ष या नात्याने निकटचा संबंध आहे. गरज भासेल तेव्हा ते या संस्थांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येतात; मात्र कोणत्याही एकाच संस्थेत किंवा पदाच्या चौकटीत ते कधीही अडकून पडत नाहीत. समाजासाठी निस्वार्थपणे चांगलं काम करणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभं राहायचं, पण स्वतः कुठल्याही मोहजजाळात किंवा बंधनात अडकायचं नाही, हे ते जाणीवपूर्वक पाळत आले आहेत.
विद्यार्थी सहायक समिती या संस्थेत त्यांच्या मार्गदर्शनातून समितीत सुरू झालेले उपक्रम, एखाद्या विद्यार्थ्याने नवे काही केले की, ते समजून घेऊन त्याला कशी मदत करता येईल, यासाठीचे त्यांचे प्रयत्न, कोण कुठे भेटले आणि समितीशी संबंधित विषय वाटला की त्याला जोडण्यासाठीचे प्रयत्न, दरवर्षी संस्थेसाठी आर्थिक योगदान देतानाच यावर्षी संस्थेच्या भविष्याचा विचार करून दिलेली मोठी मदत या साऱ्यांतून त्यांचे मोठेपण लक्षात येते.
आपण समाजाचे देणे लागतो ही त्यांची जाणीव सतत जागृत असते. संस्था सांभाळणं, वाढवणं आणि त्याला नावलौकिक मिळवून देणं, यासाठी विशेष गुणांचा कस लागतो, जो पवार साहेबांमध्ये आहे. शिस्तबद्धता, नि:स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी आपली छाप या संस्थांवर उमटवली आहे. त्यांच्या औद्योगिक, सामाजिक व व्यवस्थापन क्षेत्रातील दीर्घ अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ या संस्थांना झाला आहे.
मी गेली अनेक वर्षे त्यांना पाहतो आहे. टाय लावलेले, टापटीप कपडे, शांतपणे बोलणारे, अतिशय अदबीने वागणारे आणि वेळेच्या बाबतीत अतिशय कडक शिस्त पाळणारे. आपल्या तंदुरुस्तीविषयी ते नेहमीच जागरूक असतात. त्यांनी आरोग्याबाबत घेतलेली काळजी अत्यंत आदर्शवत आहे. आपल्या प्रचंड व्यस्त कामांतूनही ते रोज व्यायामासाठी वेळ काढतात. जी व्यक्ती व्यायामासाठी एक तासही वेळ काढू शकत नसेल तर त्याचं टाइम मॅनेजमेंट चुकतंय असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातही पवार साहेबांची वाटचाल अशीच आरोग्यपूर्ण व स्नेहपूर्ण राहो, त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्य लाभो ही प्रार्थना.
डॉ. गिरीश देसाई
कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET), पुणे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.