
मुंबई, दि. १० : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हरित कर्जरोखे जारी केले. अशा ' कॅपिटल मार्केट' मधून निधी उभारणारी पिंपरी- चिंचवड ही देशातील पहिली महानगर पालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हरित कर्जरोखे लिस्टिंग कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॅा. के गोविंदराज,बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पिंपरी - चिंचवड महापालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच १०० कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी ५ वर्षांचा असून त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
शेअर बाजारात कर्जरोखे ' लिस्टिंग ' करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. कॉर्पोरेट अटी-शर्तींची पूर्तता करताना लिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पायाभूत सोयी-सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. ही कामे हरित पद्धतीची, पर्यावरणासाठी पूरक आणि शाश्वत उत्क्रांतीची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे २० कोटीचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमपूर्वी बेल वाजवून कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आले.
हरित कर्ज रोख्यांविषयी थोडेसे...
हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यू करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून 'एए +' (AA+) पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.