मुंबईत मराठी माणसाला नोकरीत नो एण्ट्रीचा संतापजनक प्रकार घडलाय. मुंबईच्या मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजरची जागा असल्याची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या जागेसाठी मराठी माणसाने अर्ज करु नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. साम टीव्हीनं सर्वात आधी ही बातमी दाखवली आणि सगळीकडे संतापाची लाट पसरली.
मनसेचे पदाधिका-यांनी थेट आर्या गोल्ड कंपनीचा मालक बंटी रुपरेझा याला गाठलं आणि त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. मग हा मालक गयावया करू लागला आणि जाहीर माफी मागू लागला. त्याला मनसेनं एवढ्यावरच सोडलं नाही तर त्याच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेत तो बोर्ड त्याच्याच घराबाहेर त्याच्याकडून लावून घेतला.
सामच्या बातमीनंतर मालकानं लगेचच ऑनलाईन जाहिरातीत बदल केला आणि मराठी उमेदवारांसाठी ही जाहिरात खुली केली. मात्र मराठी माणसाला उघडपणे डावलण्याची ही काही पहिलीच घटना नाही. तर काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीत ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी मराठी माणूस नको, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडलाय. त्यामुळे याप्रकराची सरकारनं गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केलीय.
एकेकाळी ‘मुंबई कुणाची?’ अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा. मात्र आता महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा आणि मराठी माणूस परका, पोरका आणि हद्दपार होत चालला आहे. त्याला कारणीभूत येथील राजकीय पक्ष देखील आहेत..केवळ मराठी माणसाच्या जीवावर सत्ता येणार नाही अन् त्याला डावलूनही चालणार नाही. त्यामुळे गरजेपुरतं आक्रमक व्हायचं आणि इतरवेळी बोटचेपी भूमिका घ्यायची असं दुटप्पी धोरण राजकारण्यांनी राबवल्यामुळे मराठी माणसाची मुंबईत होणारी गळचेपी वाढत चाललीय. मात्र यामुळे दुर्दैवानं म्हणावं लागतं आपुल्या घरात क्रंदते मराठी. आपुल्या घरात हाल सोसते मराठी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.