केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरच आता शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली.''
ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे.''
केंद्रीय अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही.''
ते म्हणाले, ''महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधान विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर ह्यांचा जूना आकस आहे म्हणून? बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी?''
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ''महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी या बजेटमधून काय मिळवता आलंय? ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा. शिंदे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करुन राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचं राजकारण करायला जमतं. महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच यांच्यात नाही.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.