NCP Agitation Against Abdul Sattar: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. मुंबईत सत्तारांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्या तर, औरंगाबादेत सत्तारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. राष्ट्रवादीने सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यासाठी ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. सत्तारांविरोधात राष्ट्रवादीच्या महारष्ट्रभरातील आंदोलनांचा घेतलेला आढावा...
मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सत्तार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घराच्या काचा फोडल्या. यामुळे आता मंत्रालयाबाहेरील पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला. यावेळी मेहबूब शेख, सूरज चव्हाण आणि विद्या चव्हाण यांच्यासह जवळपास 20 कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
बीडमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांचा प्रतीकात्मक पुतळा बीडमध्ये जाळण्यात आला. तर एका महिलेविषयी अश्लील भाषेत बोलत, बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारचा, या खोके सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा या कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना कोळशासारखा आम्ही कोळश्यासारखं जाळू. असा सणसणीत आणि टोकाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड हेमा पिंपळे यांनी दिला आहे..
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने हे दहन करण्यात आले. या वेळी सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. सदरचं आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाचपाखाडी येथील कार्यालयासमोर करण्यात आले.
डोरलेवाडी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल बारामती तालुक्यातील डोलेवाडी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा एकाही मंत्र्याला पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे यांनी दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर राष्ट्रवादीने आक्रमक आंदोलन केले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून चप्पलांचा हार घालत निषेध करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
औरंगाबाद शहरात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हातात खोके घेऊन सत्तारांच्या घरासमोर आंदोलन केले. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करत पुतळा जाळला. तसेच प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली.
सोलापूर राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यातल आले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडेमारो करत त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. सोलापुरातील चार हुतात्मा स्मारकासमोर केली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी केली.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्याबाहेर अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध नोंदवला. अब्दुल सत्तार गद्दार है, पन्नास खोके माजलेत बोके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच अब्दुल सत्तार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. नाशिक-पुणे महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांना उत्तर महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्षा अनिता परदेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिला आहे.
जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होतअब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध जोरदार घोषणबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करत अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अब्दुल सत्तार यांचा २४ तासात राजीनामा द्यावा अन्यथा अब्दुल सत्तार यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाचा २४ तासात राजीनामा न घेतल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलनाचा इशारा बदनापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिलाय.
बुलढाणा जिल्ह्यात सत्तारांविरोधात रास्तारोको करण्यात आला. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सिंदखेडराजा येथे आज बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे संग्रामपूर येथे संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करून अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा फोटो जाळून आक्रमक आंदोलन केलंय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नांदेडमध्येही मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोड्याने मारत सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह महिलादेखील उपस्थित होत्या.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी कडून आंदोलन केले. पुण्यातील बालगंधर्व चौकात सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले गेले. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपण कशाचा निषेध करतोय याचा विसर पडला का काय असं इथे दिसतं आहे. कारण शिवी दिल्याचा निषेध करताना अब्दुल सत्तार शिव्या देत घोषणा दिल्या गेल्या.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांना डुक्कर असल्याचे बॅनर लावण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारले गेले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.