

संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदारांनी अपेक्षेपेक्षा वेगळा वेगळा संदेश दिलाय. राजकारणातील मोठी नावे, प्रस्थापित नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मतदारांनी कुठे ठाम नकार दिल्याचं पाहायला मिळालं. तर काही राजकीय घराण्यांना मात्र संधी देत विश्वासही व्यक्त केलाय. त्यामुळे ही निवडणूक केवळ विजय–पराभवापुरती न राहता, राजकीय प्रवाह बदलण्याची नांदी ठरल्याचे पाहायला मिळालं.
मुंबई महापालिका निवडणुकीत माजी मनपा नेते विनोद मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक, शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय कुडाळकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे माजी विरोधी पक्षनेते रविराजा यांचा धारावीतील प्रभाग क्रमांक 185 मधून पराभव झालाय. तर भाजपच्या उज्ज्वला मोडक यांनाही मतदारांनी नाकारल्याचे दिसून आलं.
मात्र दुसरीकडे काही राजकीय कुटुंबांवर मुंबईकरांनी विश्वास कायम ठेवलाय. वरळीमधून शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर विजयी झाल्या आहेत. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान, शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या पत्नी मानसी सातमकर, भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांच्या पत्नी अंजली सामंत यांचा विजय झाला.
माजी नगरसेवक कमलेश यादव यांची कन्या मनीषा यादव, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर आणि बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांनीही विजय मिळवल्याचे दिसून आलं.
यंदा झालेल्या निवडणुकीत मुंबईकरांनी “नावावर नव्हे, कामावर मत” देत घराणेशाहीला अंध समर्थन नाकारल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी कार्य आणि संपर्क पाहून संधी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळात राजकीय पक्षांना उमेदवार निवडीत अधिक सावध आणि लोकाभिमुख भूमिका घ्यावी लागणार, हे या निकालांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.