Mumbai Crime : बनावट पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा; अख्खी हॉटेल इंडस्ट्री हादरली होती, असा अडकला जाळ्यात
मुंबईत प्रकाश ज्ञानेदेव जाधव या बनावट पोलीस अधिकारीला अटक
हॉटेलमध्ये स्वतःला वरिष्ठ क्राईम ब्रांच अधिकारी म्हणून भासवून केली होती फसवणूक
पोलिसांनी CCTV तपास आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे लावला आरोपीचा शोध
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली, पोलिसांकडून पुढील सुरु
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. या आरोपीने स्वतःला क्राईम ब्रांचचा वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून गोरगाव येथील एका लॉजमध्ये राहून बिल न भरता फसवणूक केली होती. अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रकाश ज्ञानेदेव जाधव उर्फ पक्या (41) असे असून तो मलाड पश्चिम, मालवणी अंबुजवाडीचा रहिवासी आहे. तो मुळचा माथाडी कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 ते रात्री 9.30 दरम्यान आरोपी भगतसिंह नगर-2, लिंक रोड, गोरगाव पश्चिम येथील नेक्सस इन लॉजमध्ये आला.तिथे त्याने स्वतःला मुंबई क्राईम ब्रांचचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून खोली बुक केली. जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे ओळखपत्र आणि बिलाची मागणी केली, तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार देत हॉटेल मालकाला धमकावले.
धमकीनंतर हा पोलीस अधिकारी नसून कोणीतरी तोतया असल्याचे हॉटेल चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्ती विरोधात बांगुर नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली यानुसार बांगुर नगर पोलिसांनी BNS कलम 204 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली PI अमित शितोळे, PSI संजय सरोलकर, PSI योगेश रणधे आणि पथकाने CCTV फुटेज तपासले व गुप्त माहिती गोळा केली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपीच्या हालचाली समोर आल्या आणि 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 1.53 वाजता लिंक रोड, गोरगाव येथे त्याला अटक करण्यात आली.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आज त्याला बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीने मुंबईत अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत बांगुर नगर पोलीस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

