

मुंबईत धावत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील या घटनेत भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट एका प्रवाशाच्या छातीत घुसला. या हल्ल्यात सुरेश द्वारका शर्मा (५३ वर्षे) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्याचे रहिवासी असलेले सुरेश शर्मा गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील सायन-धारावी परिसरात राहतात. ते सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ते कामानिमित्त बोरीवली पूर्व येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी ११.५८ वाजता त्यांनी बोरीवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप फास्ट लोकल पकडली.
लोकलच्या पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्या मागील बाजूला बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये शिवीगाळ आणि बाचाबाची सुरू होती. अंधेरी स्थानक येण्यापूर्वी हा वाद अधिकच विकोपाला गेला आणि दोघेही दरवाजाजवळ आले. दुपारी सुमारे १२.१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबल्यानंतर त्यापैकी एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला.
फलाटावर उतरलेला प्रवासी डब्यातील तरुणाला शिवीगाळ करत होता. लोकल पुन्हा सुरू होताच त्याने रागाच्या भरात हातातील धारदार शस्त्र डब्याच्या दिशेने फेकले. हे शस्त्र संबंधित प्रवाशाला न लागता दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे डब्यात एकच गोंधळ उडाला.
रक्तबंबाळ अवस्थेत सुरेश शर्मा खाली कोसळले. यावेळी सहप्रवाशांनी त्यांना मदत करत चेन पुलिंग करून लोकल थांबवली. लोकल बांद्रा स्थानकात पोहोचल्यानंतर आरपीएफ आणि एमएसएफच्या जवानांनी जखमींना तातडीने स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली. शिवाजी लक्ष्मण गायकवाड (वय २५ वर्षे, रा. निफाड, नाशिक) असे आरोपीचे नाव असून तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले. जखमी सुरेश शर्मा यांच्या जबाबावरून हत्येचा प्रयत्न आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.