

मुंबई विमानतळावर प्रवाशाने बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला
मुंबई विमानतळाच्या टी२ टर्मिनलवर बॉम्बच्या दाव्याने खळबळ
बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगणाऱ्या प्रवाशाला सीआयएसएफने घेतलं ताब्यात
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर ‘बॅगेत बॉम्ब आहे’ असे सांगत एका प्रवाशाने खळबळ उडवून दिली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या बोर्डिंग गेटवर सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशाने हे वक्तव्य केल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली. उड्डाणापूर्वीच संबंधित प्रवाशाला विमानातून उतरवून सीआयएसएफकडून ताब्यात घेण्यात आले. सहार पोलिसांकडून या प्रवाशाची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला जाण्याची तयारी सुरू होती. एअरसाइड बोर्डिंग गेटवर एअरलाइनचे असिस्टंट सिक्युरिटी मॅनेजर ओमप्रकाश राजभर आणि सुरक्षा अधिकारी रवींद्र रोकडे हे प्रवाशांच्या हँडबॅगची नियमित तपासणी करत होते. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बॅगेमध्ये माचिस, लायटर, कात्री, द्रव पदार्थ किंवा इतर प्रतिबंधित वस्तू आहेत का, अशी नियमित विचारणा केली. त्यावेळी अनुज जयराम सुवर्णा (वय ५५) याने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले.
‘बॉम्ब’ हा शब्द ऐकताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) माहिती दिली. CISF जवानांनी तातडीने कारवाई करत प्रवाशाला विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमानातील इतर सर्व प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आले. त्यानंतर CISF आणि बॉम्ब शोधक पथकाने विमान, कार्गो तसेच प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळला नाही. संपूर्ण सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला दिल्लीसाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, CISFने अनुज सुवर्णा याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपण हे वक्तव्य केवळ गंमत म्हणून केले होते, असा दावा केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याला इशारा देऊन सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रवाशाच्या या वक्तव्यामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला मोठी धावपळ करावी लागली. विमानाची तपासणी, प्रवाशांना खाली उतरवणे आणि सुरक्षा प्रक्रिया यामुळे उड्डाणालाही विलंब झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहार पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.