
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईतील हाजी अलीजवळील लोटस जेट्टी परिसरात आज सायंकाळी 'अस्थी विसर्जन' करताना तीन व्यक्ती समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तीनही व्यक्तींना बाहेर काढून तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापैकी दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिसऱ्याची प्रकृती स्थिर आहे.
संतोष विश्वेश्वर (वय 51) कुनाल कोकाटे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. संजय सर्वणकर (वय 58) यांच्यावर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परेल येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या एमएसईबीचे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक संतोष विश्वेश्वर यांच्या आईचे आज बारावे होते.
अस्थी विसर्जन करण्यासाठी संतोष विश्वेश्वर कुणाल कोकाटे आणि संजय सरवणकर हे हाजी अली जवळील लोटस जेट्टी येथे गेले. मात्र मागील पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात हाय टाईड असल्यामुळे उंच लाटा उसळत आहे. लोटस जेट्टी परिसरात अस्थीविसर्जन करत असताना खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे तिघेजण समुद्रात बुडाले. तिघे बुडत असताना स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांनी तत्परतेने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. तर नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, नायर रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर संजय सरवणकर यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. संतोष विश्वेश्वर यांच्या मृत्यूने लोअर परेल येथील गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि बीडीडी चाळ रहिवासी तसेच प्रकाश गड एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत अधिक तपशील मिळवण्यासाठी ताडदेव पोलिस स्थानकाच्या PSI श्रीमती राजपूत यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एका जीवाचे रक्षण होऊ शकले. मात्र, दोन निरपराध जीवांचे निधन दु:खदायक आहे. पुढील तपास ताडदेव पोलिस ठाणे करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.