
गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटला नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. या अपघाताने एकच खळबळ उडाली. या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्पीड बोटच्या इंजिनाच्या चाचणी दरम्यान बोटीवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचा दावा नेव्हीने केला आहे.
तर नीलकमल बोट दुर्घटनेला नेव्ही कर्मचाऱ्यांची स्टंटबाजी जबाबदार असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीने केला आहे. हा अपघात घडला त्यावेळी नेव्हीचे कर्मचारी स्टंटबाजी करत असल्याचा प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे. स्पीड बोटने आधी ४ ते ५ वेळा घिरट्या मारल्यानंतर आमच्या बोटीजवळून ती बोट वळवताना हा अपघात झाला असल्याचे प्रत्यदर्शीने सांगितले.
श्रावण कुमार या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नीलकमल बोट दुर्घटनेला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून नेव्हीचे कर्मचारी जबाबदार आहेत. नेव्हीचे अधिकारी स्टंटबाजी करत होते आणि त्यामुळेच ही दुर्घटना झाली आहे.' श्रावण कुमार यांनी नेव्हीचा इंजिनाची चाचणी सुरू असल्याचा दावा खोडून काढला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा अपघाताचा थरारक लाइव्ह व्हिडीओ श्रावण कुमार यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता.
तर दुसरीकडे, नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचा प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे. य बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला बसायला जागा देखील नव्हती. त्यांच्यासाठी अतिरिक्त खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. अनेकांना लाइफ जॅकेट मिळाले नाही. पैशाच्या हव्यासापायी बोटीत प्रवाशांना भरले जाते. बोटीत १०० हून अधिक प्रवासी होते असं देखील या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामधील ९० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
जखमींमधील ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर उरणच्या जेएनपीटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.