
मुंबई : गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांच्या बोटीचा भीषण अपघात झाला आहे. स्पीड बोटीने प्रवाशांच्या बोटीला धडक दिल्याने प्रवाशांची बोट समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये ८० प्रवासी होते. त्यातील ७७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारनेही मदतीचे आदेश दिले आहेत. आता हा भीषण अपघात कसा घडला, याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताची थरारक घटना बोटीचे मालक रांजेंद्र आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी दिली.
मुंबईच्या गेटवेजवळील भीषण अपघातातील या प्रवाशांच्या बोटीत ८० प्रवासी होते. या बोटीच्या अपघाताचा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बोटीचा अपघात झाल्यानंतर जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या जीवरक्षकांनी तातडीने ७७ प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. एलिफंटाकडे दररोज शेकडो प्रवासी जातात. या बोटीच्या अपघातानंतर प्रवासी पाण्यात पडल्यानंतर जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर हेलिकॉप्टर आणि प्रशासनाच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या.
नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र यांनी सांगितलं की,'आमची बोट रोज अडीच वाजल्यांतर एलिफंटाकडे जाते. ती नेहमीप्रमाणे जात होती. त्यानंतर नेव्हीची बोट तिथून आली. नेव्हीच्या बोटने एक राऊंड मारला. त्यानंतर पुन्हा आली. या बोटीने आमच्या प्रवाशांच्या बोटीला धडक दिली. यामुळे अपघात झाला. या प्रवासी बोटीत ८० प्रवासी होते. बोट बुडाल्यानंतर प्रवाशांना तातडीने दुसऱ्या बोटीने पाण्याबाहेर काढलं. या बोटीची क्षमता ८४ आहे'. तर प्रवासी बोटीच्या खलाशाने या घटनेचा व्हिडिओ काढल्याची माहिती माजी आमदार जयंत पाटील यांनी सांगितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना झाल्यात. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात आहेत. या घटनेत सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आलंय. अजूनही बचावकार्य सुरू असून यासाठी यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत'.
'नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर या बोटमधील सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले. एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही फोनवरून संवाद साधत माहिती घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.