मुंबईकरांचा प्रवास महागणार
रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ होणार
रिक्षा १ रुपयांनी वाढणार
टॅक्सी भाडे २ रुपयांनी वाढणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महागणार आहे. मुंबईत दररोज हजारो प्रवासी लोकल, रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करतात. त्यातच आता ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. दरम्यान या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.
परिवहन विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, ऑटोरिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयाची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याचे २६ रुपयांचे किमान रिक्षा भाडे वाढून २७ रुपये होऊ शकते. तर टॅक्सीच्या पहिल्या १.५ किलोमीटरसाठी असलेले किमान भाडे ३१ रुपयांवरून किमान ३३ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल, विमा आणि परवान्यांशी संबंधित खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केली आहे. चालकांच्या उत्पन्नावर वाढत्या खर्चाचा मोठा परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
मुंबई टॅक्सीमेन युनियनने मात्र काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या भाड्यात किमान ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, प्रवासी संघटनांनी या संभाव्य भाडेवाढीला विरोध केला आहे. आधीच महागाईचा भार वाढलेला असताना वाहतूक खर्चात आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर ताण येईल,असं म्हटलं आहे. अंतिम भाडेवाढ लागू होण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असून, निर्णयानंतरच नवीन दर स्पष्ट होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.