मुंबई ATS च्या काळाचौकी युनिटने दहशतवादी संबंध असलेल्या तरुणाला अटक केली
मोहम्मद हसन अख्तर असे आरोपीचे नाव आहे
त्याच्या फोनमध्ये पाकिस्तनशी संबंधित काही पुरावे मिळाल्याने खळबळ
संजय गडदे, मुंबई
मुंबईतील माहिम परिसरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) काळाचौकी युनिटने ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय त्याच्यावर व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीच्या डिजिटल हालचाली, सोशल मीडिया पोस्ट आणि टेलिग्रामवरील संपर्कांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
ATS च्या दाव्यानुसार, आरोपीच्या मोबाईल फोनची तसेच सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली असता काही भडकावणारे पोस्ट, जिहादच्या समर्थनार्थ संदेश आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या भाषणांचे ऑडिओ आढळले. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहे. तपासात आरोपी इन्स्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे समोर आल्याचे सांगितले जाते. त्याच्या पोस्टमधून जिहादचे समर्थन करण्यात आल्याचा आणि मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींना शस्त्रे हाती घेण्यास प्रवृत्त करणारे मेसेज व्हायरल केल्याचा आरोप ATS ने केला आहे. याशिवाय, आरोपी टेलिग्राम ग्रुप चालवत असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे.
१ जून २०२६ रोजी आरोपीच्या टेलिग्राम ग्रुपवर मसूद अझहर याच्या बाबरी मशीद आणि अन्य विषयांवरील भडकाऊ भाषणांचे ऑडिओ अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, पाकिस्तानसमर्थक कट्टरतावादी विचारसरणीशी संबंधित ‘IBN-e-Qasim’ या टेलिग्राम चॅनलचा आरोपी सक्रिय सदस्य असल्याचेही सांगण्यात येत आहे.
आरोपी रॅपिडो रायडर म्हणून काम करत होता आणि अत्तर विक्रीचाही व्यवसाय करत होता, अशी माहिती आहे. ८ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील कथित त्रुटींविषयी प्रसिद्ध झालेल्या बातमीवर त्याने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित व्यक्तींशी संपर्क होता का, तसेच या प्रकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास ATS करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.