मुलुंड-ऐरोली मार्गावर अपघातानंतर ट्रक हेल्परचे अपहरण झाले.
हेल्परची पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरातून सुटका झाली.
दिलीप खेडकर आणि अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल.
खेडकर कुटुंब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; नवी मुंबई पोलिस तपास सुरू.
पूजा खेडकर हीचं कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. मुलुंड-ऐरोली मार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातानंतर सिमेंट मिक्सर ट्रकच्या हेल्परचे अपहरण झाले आणि हा हेल्पर पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरी सापडला. धक्कदायक बाब म्हणजे हे अपहरण पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी केलं असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सातच्या सुमारास मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाची कार यांच्यात किरकोळ धडक झाली. या कारमध्ये दोन व्यक्ती तर ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार होते. अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि ट्रक आमच्या मागे घेण्याची सक्ती करण्यात आली. काही अंतरावर कार अचानक ट्रकच्या नजरेआड झाली. चालकाने तत्काळ आपल्या मालक विलास ढेंगरे याला फोन करून संपूर्ण प्रकार कळवला.
यावर ढेंगरेंनी नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी गाडीचा माग काढण्याचे काम सुरू केले आणि MH 12 RP 5000 क्रमांकाची ही कार थेट पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरासमोर आढळून आली. यावरून पोलिसांचे पथक खेडकर यांच्या घरात दाखल झाले. मात्र त्या वेळी गेट उघडण्यास पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांनी नकार दिला. पोलिसांच्या सततच्या प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर अखेर घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुखरूप सुटका करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत असेही उघड झाले आहे की नुकसानभरपाईच्या वादातून या घटनेला सुरुवात झाली. अपघातानंतर झालेल्या वादात दिलीप खेडकर यांनी आपल्या अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांच्या मदतीने हेल्परला पोलिस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली थेट पुण्यातील घरात डांबून ठेवले. पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिल्याने दिलीप खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तरुणाची सुटका केली असून दिलीप खेडकर, त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे आणि इतरांविरुद्ध अपहरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आधीच विविध प्रकरणांतून वादग्रस्त ठरलेले खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणामुळे त्यांच्या कायदेशीर अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.