मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याने वाद
जैन समाजाच्या शिष्टमंडळाने शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली
प्रतिनिधींनी लेखी माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली
मराठी अस्मितेचा आदर राखण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले
काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या वादग्रस्त प्रकरणानंतर मालाड येथील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' वर भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबाबत लेखी माफीनामा सादर करण्यात आला.याबाबत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मालाड (पूर्व) परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरही या प्रकाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर संबंधितांकडून सार्वजनिक माफी मागण्यात आली होती.
आज झालेल्या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींना मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्याबाबत स्पष्ट शब्दांत समज दिली. तसेच अलीकडेच मुंबईत रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पट्ट्यांवर झालेल्या वादाप्रकरणी देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. मुंबईतील काही भागांत पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार घडत असल्याचा उल्लेख करत त्यांनी अशा घटनांमुळे समाजात विनाकारण तणाव निर्माण होत असल्याचे सांगितले.
"राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी अस्मितेचा आदर राखला गेला पाहिजे. कोणत्याही कारणाने समाजात तेढ निर्माण होईल अशी कृत्ये टाळली पाहिजेत. जैन आणि मराठी समाजामध्ये निर्माण होणारे वाद तातडीने थांबले पाहिजेत," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान, जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी ग्वाहीही दिली. या भेटीनंतर मालाडमधील वाद शांततेत मिटल्याचे चित्र दिसत असून, मराठी अस्मितेबाबत मनसेची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.