कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठं खिंडार
माजी नगरसेवक विजय काटकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश
काँग्रेसचे नेते सलीम काझी यांचाही शिंदेसेनेत पक्षप्रवेश
केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची ताकद वाढली
महापालिका निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटासोबतच काँग्रेसला मोठं खिंडार पडले. ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक विजय काटकर यांनी कुटुंब आणि शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीदरम्यान शिंदे गटाची ताकद वाढली.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या १२२ जागांसाठी निवडणुका सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच अनेक विरोधकातील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमध्ये २० उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले. यामुळे महायुतीवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरा सुरू आहेत. असे असतानाच आता महायुतीकडून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला पुन्हा झटका देण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेत ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरू केला आहे.
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक विजय काटकर आणि त्यांचे कुटुंब हे काही इच्छुक उमेदवार आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा कल्याण मोहने परिसरातील शिवसेनेचे उमेदवार मयूर पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काटकर यांच्यासोबत काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विजय काटकर हे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, केडीएमसी परिवहन समितीचे माजी सभापतीआणि माजी नगरसेवक होते. अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करत पक्षप्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे काटकर आणि त्याच्या मुलीने ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यावर उमेदवारीसाठी एक ते दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. तसंच, माझी मुलगी उमेदवारीसाठी इच्छुक होती. मात्र बाहेरून आयात उमेदवार आणून आमचा पत्ता कट करण्यात आला. इथे निष्ठेला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे, असा थेट आरोप काटकर यांनी ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यावर केला. दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सलीम काझी यांनी काँग्रेसमधील हुकूमशाही कारभार आणि सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली. विकासकामांसाठी पुढाकार घेऊनही सन्मान मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.