

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंच्या मनसेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. मनसेच्या महिला शहर अध्यक्षा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आणि पदाधिकारी कौस्तुभ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचा राजीनामा दिला असला तरी, कोणत्याही स्थानिक नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कुठलीही नाराजी नाही, असं देसाई यांनी स्पष्ट केलं.
महापालिका निवडणुकांचं रण तापलं आहे. प्रमुख राजकीय पक्षांतून इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू झालंय. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळ तर ढवळून निघालं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्याचवेळी शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे.
मनसेच्या महिला शहर अध्यक्षा, माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, मनसे पदाधिकारी कौस्तुभ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, तसेच सचिन पोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपण मनसेचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा कोणताही पदाधिकारी किंवा पक्षावर माझी नाराजी नाही, असं कौस्तुभ देसाई यांनी स्पष्ट केलं.
राजीनामा दिल्यानंतर काल कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करा असे सूचवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण - डोंबिवलीत केलेली विविध विकासकामे, शहराच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ पाहूनच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय, असेही त्यांनी सांगितले.
कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. प्रभागाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता. याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली. मात्र कोणतंही ठोस उत्तर मिळत नव्हतं. म्हणून हा निर्णय घेतल्याचं कस्तुरी देसाई यांनी सांगितलं.
या पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष आहे. शिवसेनेत कोणी मालक नाही. कोणी नोकर नाही. सर्व कार्यकर्ते आहेत, असंही शिंदे म्हणाले. सचिन पोटे यांनी कोणतीही अट किंवा शर्त न ठेवता शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो, असेही ते आवर्जुन म्हणाले.
निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला गुलाल उधळायचा. फटाके फोडायचे आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा व विधानसभा जिंकल्यानंतर आता महापालिकाही महायुती जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच विरोधकांचा टांगा पलटी, घोडे फरार झाला आहे, असा टोलाही लगावला.
सचिन पोटे यांच्या प्रवेशामुळे कल्याण-पूर्वेत शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार आहे. कार्यकर्त्यांची ताकद, एकजूट आणि संघटन हेच शिवसेनेचे खरे भांडवल आहे. कल्याण-पूर्वेतील प्रलंबित प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असणार आहे. तसेच येथील विकासकामांवर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली. लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार घडवला. ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.