Maharashtra Vidhan Sabha Election : मतदान केंद्रावरील मोबाइल बंदीला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay high court) आव्हान देण्यात आलं आहे. मनसे नेत्या उज्ज्वला यादव यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. एखाद्या मतदाराकडे ओळखपत्र नसल्यास त्याला मतदानापासून वंचित राहावं लागतं. पण मोबाइल सोबत घेऊन जाण्यास परवानगी मिळाली तर, किमान डिजिलॉकरमधून आवश्यक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असं म्हणणं याचिकेत मांडण्यात आलं आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान पार पडणार आहे. मतदान करताना मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. आयोगाच्या याच निर्णायाविरोधात मनसे नेत्या उज्वला यादव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही. मतदान केंद्राबाहेर फोन ठेवण्यासाठी आयोगाने कोणतीही सोय केलेली नाही. त्यामुळे मतदार मतदान केंद्राकडे जाणार नाहीत, असे उज्वला यादव यांनी आपल्या याचिकेत म्हटलेय.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आणलेल्या डिजीलॉकर ॲपद्वारे मतदारांना फोन घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. ओळखीचा पुरावा दाखवण्यासाठी मोबाइल वापरण्यास द्यावा. तसे भारतीय निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटलेय.
उज्वला यादव यांनी जगदीश सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यामध्ये १४ जून २०२३ आयोगाच्या कामकाजाचा संदर्भ देण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्राबाहेर सोयी सुविधाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मतदान केंद्राजवळ १०० मीटर अंतरावर मतदान निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक/पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त कुणालाही जाता येणार नाही, असे सांगण्यात आलेले.
मतदानाला आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यक्तींकडे फोन नसल्यामुळे जवळच्या व्यक्तींना संपर्क साधता येत नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा भाग आहे. लोकशाहीला बळकटी मिळण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. तसेच सध्याच्या युगात मोबाइल हा फक्त बोलण्याचं साधन राहिला नाही. डिजिटायझेशनचा महत्त्वाचा घटक बनलाय. त्यामुळे मतदान केंद्रावर फोन किंवा डिजीलॉकरद्वारे ओळखपत्र न दाखवू देणं हे मतदारांच्या हक्काचे उल्लंघन केल्यासारखं आहे, असे यादव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
भारतामध्ये 321 मिलियन युजर्स डिजिलॉकर वापरत आहेत. डिजिलॉकरमध्ये ७.७६ बिलियन कागदपत्रे जमा आहे. १३ नोव्हेंबर या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.