राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. (Latest Marathi News)
सोमवारी (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
मात्र, मी फक्त काँग्रेसचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं होतं. मात्र, चव्हाण यांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार असून त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस (आघाडी) सरकारमध्ये वरिष्ठ मंत्रीपदे भूषवली आहेत. ते दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी देखील दोन वेळा काँग्रेसकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून राहिलेली पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.