

मनसेला पुन्हा मोठा धक्का, आणखी एक शिलेदार बाहेर
संदीप ढवळे यांनी शिंदे गटात प्रवेश
याआधी संदीप धुरी, राजा चौगुले, हेमंत कांबळे यांनीही दिली साथ
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आणखी एका शिलेदारानं जय महाराष्ट्र केलाय. संतोष धुरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यांच्यानंतर मनसेचे सरचिटणीस राजा चौगुले, प्रवक्ते हेमंत कांबळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. आता जोगेश्वरी येथे राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. मनसेचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक असलेले संदीप ढवळे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने जोरात प्रचार सुरू केलाय. दुसरीकडे ठाकरे बंधूंनीही मुलाखती आणि पक्ष कार्यकर्त्यांना भेटीगाठीचा धडाका लावलाय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मेळावा घेणार आहेत. दुसरीकडे अमित आणि आदित्य ठाकरे एकत्र प्रचार करू लागलेत. त्याचवेळी मात्र मनसेत कार्यकर्त्यांची गळती सुरू झालीय.एकनाथ शिंदेंनी जोगेश्वरीमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. संदीप ढवळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख संदीप ढवळेंसह वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर तसेच उद्योजक ईश्वर रणशूर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केलाय. संदीप ढवळे हे कट्टर राज ठाकरेंचे समर्थक मानले जात. विशेष म्हणजे जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा कार्यकर्त्यांची फळी तयार केली होती. दरम्यान संदीप ढवळे हे मनसे नेते अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे संदीप ढवळे यांनी पक्ष सोडल्यानं जोगेश्वरीत मनसेचं मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जोगेश्वरीतील वार्ड क्रमांक ७४ मधून संदीप ढवळे यांच्या पत्नी सायली ढवळे निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे हा वार्ड मनसेला सोडण्यात आला. पण याठिकाणी मनसेने विद्या भरत आर्या कांगणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप ढवळे यांनी पत्नी सायली ढवळे यांचा अपक्ष अर्ज भरला.
मात्र २जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संदीप ढवळे आणि सायली ढवळे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी संदीप ढवळे यांची समजूत काढली. त्यानंतर संदीप ढवळे यांनी पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
२ जानेवारीला संदीप ढवळे यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली होती. मी आणि माझी पत्नी सायली संदीप ढवळे यांनी राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. साहेबांचा आदेश हाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम अशी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र ६ दिवसांनी संदीप ढवळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.