

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज त्यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहेत. अमित शहा यांच्या भेटीसाठी अनेक नेते येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पुण्यात जेडब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये सुनेत्रा पवार आल्या आहेत. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीच या हॉटेलमध्ये आले आहेत.तर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील अमित शहा यांच्या भेटीसाठी आल्या आहेत.
शिवसेनेला केंद्रात एक मंत्रीपद हवं यासाठी ओमराजे निंबाळकरही चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. मंत्रिपदावरून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत. शिवसेनेला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नेत्यांच्या भेटीदरमयान आणि बैठकीदरम्यान काय निर्णय घेतला जातोय हे पाहणे महत्वाचे राहिल.
दरम्यान, अमित शाह यांची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत स्वतंत्र बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील तीन प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्यासोबत चारही नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.