
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आगामी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने बैठकांचा सपाटा लावला आहे. मनसेने मुंबईतील 227 प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली. ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावरही माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलं.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केव्हाही लागू शकते, यामुळे मनसेकडून आगामी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा मनसेकडून आता सुरू करण्यात आला आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित आज बोरिवली, मालाड आणि चारकोप विधानसभा मतदारसंघातील गटाध्यक्षांचा मेळावा पार पडला. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीत गटाध्यक्षांवर मेळाव्याला सुरुवात झाली. 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेतील महापालिका प्रभागांमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकांचा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सादर केला जाणार असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदवकर म्हणाले, 'पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात काही निरीक्षक नेमले आहेत. त्याप्रमाणे गटाध्यक्षांची समिती आहे. त्या समितीत आम्ही सदस्य आहोत. या अंतर्गत आमचा संवाद सुरु झाला आहे. गेली २५ दिवस संपूर्ण मुंबई शहरांमध्ये समितीचे लोक ३६ विधानसभेत जात आहेत. प्रत्येक रविवारी तीन-तीन मतदार संघाचा आढावा ही समिती घेणार आहे. मुंबई शहरात शहराध्यक्ष आणि उप शहराध्यक्ष अशी नेमणूक झाली आहे. यामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी रणनीतीचा एक भाग आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघात गटाध्यक्ष किती ताकदीचा आहे, याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न करत आहोत'.
'प्रत्येक विधानसभेत महापालिकेचे सहा वॉर्ड आहेत. त्यातील मतदारांच्या याद्या आल्या आहेत. त्या खऱ्या की खोट्या आहेत, हे पाहत आहोत. त्यामुळे भविष्यासाठीच हे सगळं चालू आहे. आमचा कार्यक्रम 20 जुलै रोजी संपणार आहे. आम्ही एकूण बारा रविवार सगळेजण फिरणार आहोत. यानंतर साहेबांना आम्ही अहवाल सादर करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना नांदगावकर म्हणाले,राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून मुंबईत आले आहेत. उद्धव ठाकरे आले की नाही? मला कल्पना नाही. त्या दोन बंधूंमध्ये काय चर्चा चालू आहे, त्यांना माहिती आहे. चर्चा चालू आहे की नाही? याबाबत मला काही माहिती नाही. आता त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. वरिष्ठ बोलत असताना कनिष्ठांनी बोलू नये असे संकेत मला माहीत आहेत. मी कनिष्ठ माणूस आहे. कनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ भेटतील आणि बोलतील. आम्ही अजून कनिष्ठ आहोत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.