मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन
मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट
२५ आणि २६ जूनदरम्यान मुंबई व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Today Weather Update News उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अखेर ज्याची आपण मनापासून वाट पाहत होतो त्या मान्सूनची दमदार एंट्री कोकणानंतर आता मुंबईत झाली आहे. राज्यात नैऋत्य मौसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईसह उपनगरात २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. आज विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांना तीव्र उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेतकरी राजा देखील आनंदी झाला आहे.
राज्यभरातील नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली असतानाच पावसासाठी पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. रविवारी सकाळी मुंबईच्या काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः २५ आणि २६ जूनदरम्यान मुंबई (Mumbai Rain Update) आणि परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला काहीसा विलंब होत असला तरी वातावरणातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत उष्ण हवामानासोबतच वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागांत ढगाळ वातावरण, उकाडा आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनच्या (Monsoon Rain Update) पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे २३ जूनपर्यंत महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांत मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या अधिकृत प्रवेशाकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.