महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम
२० जूनपर्यंत राज्यभर पोहोचण्याची शक्यता
अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट
पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे
Maharashtra Weather Update Today News राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा कायम असून अल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, मान्सून २० जूनपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते. दरम्यान, पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, मॉन्सूनने पूर्व भारतात प्रगती सुरू ठेवली आहे. शुक्रवारी मॉन्सूनने पश्चिम बंगालसह बिहारच्या आणखी काही भागांत आगेकूच केली. तसेच ओडिशा आणि झारखंडमध्येही त्याचे आगमन झाले आहे. मात्र अरबी समुद्रावरील मॉन्सूनची स्थिती गेल्या आठवडाभरापासून स्थिर असल्याने महाराष्ट्रातील पुढील प्रगतीला विलंब होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग तसेच ओडिशा, बिहार, झारखंड आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.