संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नसल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशा वाजवून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरपासून दररोज १० मिनिटे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर झाले असले, तरी अद्याप स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या नियुक्त्या नेमक्या कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून उबाठा पक्षाने सत्ताधारी पक्ष आणि महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे.
स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि शासनाच्या नियमांनुसार होणे अपेक्षित आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभराने होणाऱ्या पहिल्या महापालिका सभेत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असल्याचा दावा उबाठा पक्षाने केला आहे. मात्र, तरीही या नियुक्त्यांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उबाठा पक्षाने यापूर्वी अनेक वेळा निवेदने आणि स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांचा आवाज घुमवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दररोज दहा मिनिटे ढोलताशा वाजवून हा निषेध सुरू ठेवण्याचा निर्णय उबाठा पक्षाने घेतला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबत प्रशासन आता काय भूमिका घेते आणि या आंदोलनानंतर नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.