महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लाचखोरी
लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई
दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
इराणमधून आयात होणाऱ्या ग्रीन प्लास्टिकच्या तुटवड्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना पर्याय म्हणून साधा प्लास्टिक वापरावा लागत असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लाच उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील ‘क्रिस बार अँड रेस्टॉरंट’ येथे केडीएमसीच्या प्लास्टिकविरोधी पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान हॉटेलमध्ये काही प्रमाणात प्लास्टिक आढळून आल्याने पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना केली. दरम्यान, हॉटेल चालक साईराज करमरण यांनी आम्ही ग्रीन प्लास्टिकच वापरतो, मात्र इराणमधून येणाऱ्या केमिकलच्या कमतरतेमुळे सध्या ते उपलब्ध नसल्याने पर्यायी प्लास्टिक वापरण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले. तसेच कारवाई टाळण्याची विनंतीही केली.
मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. व्यवस्थापकांनी १ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यावर कर्मचारी तयार झाले नाहीत. अखेर २ हजार रुपये देण्यात आल्यानंतर त्या कर्मचारी तेथून निघून गेल्या. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. याची गंभीर दखल घेत केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित हॉटेलवरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीच्या नावाखाली काही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना त्रास देत पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे केडीएमसीच्या प्लास्टिकविरोधी मोहिमेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर यंत्रणा उभी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.