चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद
राज मडवी यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती
तिन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याणमध्ये चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणमधील वडवली गावात ही घटना घडली आहे. या घटनेत राज मडवी यांचा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. वडवली येथील अ प्रभाग कार्यालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून राज मडवी आणि काही व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद वाढत गेला आणि त्यानंतर दोन ते तीन जणांनी राज मडवी यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राज मडवी यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे वडवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या हत्येच्या प्रकरणात विकास यादव आणि सौरभ साळुंखे यांची नावे संशयित आरोपी म्हणून समोर आली आहेत. याशिवाय, या घटनेमध्ये एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान,किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या हिंसक घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.