कल्याणमध्ये १७व्या मजल्यावरून क्रेन कोसळून १ मजूर ठार
१ मजूर गंभीर जखमी
सुरक्षा निष्काळजीपणा व नियम उल्लंघनाची पोलिस चौकशी सुरू
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या (Ritz Building) सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतराव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने बांधकाम साहित्य चढवले जात असताना अचानक तोल जाऊन क्रेन मजुरांच्या अंगावर कोसळली. या अपघातात अमा हुल्ला (22 वर्षे) या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर कौसर अलाम (23 वर्षे) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योग्य सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून न देता मजुरांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंच इमारतींवरील काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होते का?, याबाबत प्रशासन आणि कामगार विभागाकडून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. परिणामी निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेजबाबदारी विरोधात मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश उफाळून आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.