कल्याणमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी विशेष वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू
प्रमुख मिरवणूक मार्गांवर नो पार्किंग झोन लागू
वाडेघर चौक, आधारवाडी चौक आणि गोविंदवाडी बायपाससह विविध पर्यायी मार्ग निश्चित
मिरवणूक मार्गांवर वाहने पार्क न करण्याचे आवाहन
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी कल्याण वाहतूक उपविभागाकडून विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रमुख मिरवणूक मार्गांवर नो पार्किंग झोन लागू करण्यात आला असून, काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकांच्या काळात नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. कोनगावकडून दुर्गाडीमार्गे कल्याण शहराच्या दिशेने येणारी हलकी वाहने वाडेघर चौक आणि आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. दरम्यान, कोळशेवाडीहून कोनगावच्या दिशेने जाणारी हलकी वाहने गोविंदवाडी बायपासमार्गे वळवण्यात येणार आहेत. तसेच कोनगावच्या बाजूने डोंबिवली, मानपाडा, कल्याण फाटा आणि शिळफाटा या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी चौकातून वळवून दुर्गाडी-गोविंदवाडी बायपासमार्गे पुढे पाठवण्यात येणार आहे.
कोनगाव गणेश घाट आणि दुर्गाडी गणेश घाट परिसरात विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहनचालकांसाठी गांधारी पूल हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड-अवजड वाहने तसेच सार्वजनिक आणि खासगी बसेसच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तसेच मुख्य मिरवणूक मार्गांवर वाहने पार्क न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.