संघर्ष गांगुर्डे | कल्याण प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
Kalyan Ahilyanagar highway accident 11 dead details : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी काळी-पिवळी इको कारचा भीषण अपघात झाला. येथील रायते पुलावर इको गाडीने सिमेंट मिस्करला जोरात धडक दिला. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती टिटवळा पोलिसांनी दिली आहे. तर या अपघातामध्ये २ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण ग्रामीण परिसरात अहिल्यानगर महामार्गावर रायते पुलावर सिमेंट मिक्सरला इको कारने जोरात धडक दिली. यामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत मुरबाडमधील आहेत. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, ५ जणांच्या इको सीटर गाडीत 12 जण कोंबून भरून सुसाट मुरबाडच्या दिशेने चालली होती. त्यावेळी काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी आहेत. ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. दरम्यान, रायते पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितलेय. या अपघातात बबलू चंदने, जिजा केंबरी, गणपत चंदे, अनंत पवार आणि भुषण घोरपडे यांचा मृत्यू झालाय. इतर ६ जणांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
रायते पुलावर झालेल्या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तसेच, अपघातग्रस्त इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जीवितहानी अधिक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथकांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.