

इंडिगोच्या उड्डाण रद्द, अनेक आमदारांचे नागपूर अधिवेशनासाठीचे नियोजन विस्कळीत
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना करावा लागणार १२ तासांचा रोड प्रवास
चंद्रकांत पाटील आणि सिद्धार्थ शिरोळेंनी निवडला चार्टर्ड विमानाचा पर्याय
नागपूर येथे उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आज संध्याकाळी औपचारिक चहापानाचा कार्यक्रम झाल्यावर उद्यापासून एक आठवडा हिवाळी अधिवेशन संपन्न होणार आहे. यासाठी राज्यातील सर्वच आमदार नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. यंदा मात्र इंडिगो एरलाईन्स या विमान कंपनीच्या गोंधळामुळे देशातील अनेक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. इंडिगो च्या गोंधळामुळे नागपूरला जाणारे अनेक विमाने रद्द झाली आहेत. याचाच थेट फटका राज्यातील आमदारांना सुद्धा बसलाय.
नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला अनेक आमदार हे विमानाचा पर्याय वापरतात. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच आमदार नागपूरला जाण्यासाठी विमान प्रवास निवडतात. मात्र यंदा इंडिगोमुळे झालेल्या गोंधळामुळे अनेक आमदारांचे विमान प्रवास रद्द झाले आहेत. अनेक आमदारांना तर विमानाचे तिकीट रद्द केल्याचे कंपनीने कळविल्याने उद्या कसे जायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. काही आमदारांना तर विमानाचे तिकीट ऐनवेळी मिळत नसल्याने तर काही जणांना विमानाचे तिकीट काढून विमान वेळेत नाही पोहचलं तर काय असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी खाजगी वाहनाला "स्टार्टर" मारत नागपूर गाठण्यासाठी प्रस्थान ठेवलं आहे. पुणे ते नागपूर हा साधारण ७०० किलोमीटरचा प्रवास १२ तासांपेक्षा जास्त आहे. आता असं असलं तरी सुद्धा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लागण्यासाठी आमदारांची लगबग सुरू झाली आहे. पुण्यातील कोथरूड चे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर मतदार संघाचे सिद्धार्थ शिरोळे हे एकाच चार्टर्ड विमानाने नागपूरला निघाले आहेत.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी नागपूरचा प्रवास दोन टप्प्यात केला आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि तिथून नागपूर असा पर्याय त्यांनी खाजगी गाडीने निवडला. "गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगो कंपनीच्या विमानसेवाच्या झालेल्या वेळेच्या बदलामुळे मी काल संध्याकाळीच नागपूरच्या दिशेने माझ्या वाहनाने प्रवास सुरू केला. नागपूर अधिवेशनासाठी वेळेत पोहोचावं यासाठी मी कालच पुण्याहून मोटारीने आधी छत्रपती संभाजी नगर मध्ये पोहोचलो इथे काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि अधिवेशनाला वेळेत पोहोचावं यासाठी पुढे निघालो आहे," अशी प्रतिक्रिया पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली. "इंडिगो कंपनीच्या झालेल्या गोंधळामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाली आहेत. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार हे त्यांच्या मोटारीने नागपूर अधिवेशनासाठी निघाले आहेत," असं ते म्हणाले.
नागपूरला जाणाऱ्या पुणे शहरातील आणखी एक आमदार सिद्धार्थ शिरोळे हे म्हणाले, "इंडिगो विमान सेवेचा फटका राज्यातील अनेक आमदारांना पण बसलेला पाहायला मिळतोय. उद्यापासून नागपूर मध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे. चंद्रकांत पाटील आज दुपारी चार्ट विमानाने पुण्याहून नागपूरला रवाना होणार आहेत तर आम्ही देखील अनेक आमदार दादांसोबत जाणार आहोत.
पुण्यातील आमदार नागपूरला कसे जाणार?
माधुरी मिसाळ: एअर इंडियाने काल नागपूरमध्ये पोहोचल्या
चंद्रकांत पाटील: चार्टर्ड विमान
सुनील कांबळे: खासगी वाहनाने
सिद्धार्थ शिरोळे: चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने
हेमंत रासने: खासगी वाहनाने
चेतन तुपे: खासगी वाहनाने
भीमराव तापकीर: मंगळवारी नागपूरला जाणार
बापू पठारे: खासगी वाहनाने
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी विमान गोंधळाच्या परिस्थिवर नाराजी व्यक्त केलीय. साहजिकच दरवेळी विमानाने प्रवास करणाऱ्या आमदारांना आता स्वतःची गाडी नेण्याचा आटापिटा करावा लागणार आहे त्यामुळे स्वतःच्या खिशातील पेट्रोल, डिझेल तसेच १२ तासांपेक्षा जास्तीचा होणाऱ्या प्रवासामुळे पाठ कंबर एक होणार ते दुःख वेगळंच आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.