Housing Society Tree Cutting Permission Rules : सोसायटीच्या आवारातील किंवा परिसरातील झाडं परस्पर छाटणे किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे आता हाऊसिंग सोसायट्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईत सोसायट्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर झाडछाटणी आणि झाडांना विष देऊन मारण्याच्या प्रकारांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अशा सोसायट्यांवर पालिकेने थेट पोलिसांत गुन्हे (FIR) दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
मालाड पूर्वेकडील दिंडोशी मेट्रो स्टेशनजवळील डीजीएस शितल तपोवन हाउसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध झाडांना विष घातल्याबद्दल आणि घाटकोपर पश्चिमेकडील कल्पतरू ऑरा हाउसिंग सोसायटीविरुद्ध विहित मर्यादेपलीकडे छाटणी केल्याबद्दल संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे परवानगीशिवाय झाडांवर कुऱ्हाड चालवण्यापूर्वी पालिकेचे हे नवीन नियम आणि झालेली कारवाई समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा थेट पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेच्या (हाऊसिंग सोसायटी) आवारातील झाड तोडणे किंवा मोठ्या प्रमाणावर छाटणे यासाठी कडक कायदेशीर नियम आहेत. सोसायटीच्या मालकीची जागा असली तरीही परवानगीशिवाय झाड तोडणे हा फौजदारी गुन्हा मानला जातो. कोणतेही झाड तोडण्यापूर्वी, त्याला नुकसान पोहोचवण्यापूर्वी किंवा त्याची छाटणी करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. उल्लंघन केल्यास महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ (Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975)अन्वये दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाते.
परवानगीशिवाय झाड तोडल्यास किंवा झाडाला हानी पोहोचवल्यास खालीलप्रमाणे कारवाई होऊ शकते. कायद्याच्या कलम २१ नुसार बेकायदेशीरपणे झाड तोडल्यास १ आठवड्यापासून ते १ वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. जर एकापेक्षा जास्त झाडे तोडली असतील, तर प्रत्येक झाडासाठी स्वतंत्र गुन्हा मानला जातो. पालिका किंवा वृक्ष अधिकारी संबंधितांवर (झाड तोडणारा व्यक्ती, कंत्राटदार किंवा सोसायटीचे जबाबदार पदाधिकारी) पोलिसांत एफआयआर (FIR) नोंदवू शकतात.
पर्यावरण टिकवण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत. झाडांना इजा पोहोचवणे, त्यात विषारी पदार्थ टोचणे किंवा मंजुरीपेक्षा जास्त छाटणी करणे हे गंभीर गुन्हे आहेत," असे बीएमसी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतेही झाड तोडण्यापूर्वी किंवा छाटण्यापूर्वी बीएमसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोसायटीतील अथवा आवारातील झाड तोडण्याचे किंवा छाटण्याचे नियम काय?
झाड तोडणे किंवा फांद्या छाटणे आवश्यक असल्यास प्रथम सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये किंवा आमसभेत (AGM) चर्चा करून तसा ठराव मंजूर करावा लागतो. ठरावासह स्थानिक महानगरपालिका/नगरपालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्याकडे (Tree Officer) अर्ज सादर करावा लागतो. वृक्ष अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करतात. झाड खरोखरच इमारतीला, विजेच्या तारांना किंवा रहिवाशांना धोकादायक आहे का, हे पाहूनच छाटण्याची किंवा तोडण्याची परवानगी दिली जाते. झाड तोडण्याची परवानगी मिळाल्यास, तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात नवीन झाडे (प्रमाणानुसार) लावणे आणि ती जगवणे सोसायटीवर बंधनकारक असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.