सागर आव्हाड | पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
Pune Gunjavani dam drowning incident farmer brothers : पुण्यातील गुंजवणी धरण बॅक वॉटर परिसरात पाण्यात बुडून दोन सख्ख्या शेतकरी भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विद्युत शेतीपंपास पाणी कमी पडल्याने शेती पंप गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरामध्ये टाकताना मोठ्या भावाचा तोल गेला. भाऊ बुडत असल्याचे दिसल्यानंतर छोट्या भावाने पाण्यात उडी मारली. पण दोन्ही सख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या घेवंडे (ता. राजगड) गावात ही दुर्दैवी घटना घडली. संपूर्ण घेवंडे गावावर शोककळा पसरली आहे.
दामाजी भाऊ गायकवाड (वय.50 ) आणि दत्तू भाऊ गायकवाड (वय.55) अशी मृत भावांची नावे आहेत. या दोन्ही शेतकरी कुटुंबातील सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. लहान भाऊ दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास राजगड, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले. मात्र दुसऱ्या मोठ्या भावाचा दत्तू गायकवाड यांचा मृतदेह रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारापर्यंत मिळून न आल्यामुळे स्कुबा पथकास पाचारण करण्यात आले. दुसरा मृतदेह पाण्यात शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.
या घटनेची माहिती कळताच परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांकडून सुमारे सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले होते. मात्र दत्तू गायकवाड यांचा मृतदेह हाती न लागल्याने तसेच अंधार पडू लागल्याने स्कुबा पथकाच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
गुंजवणी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने धरण बॅक वॉटर परिसरामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी असणारे अनेक विद्युत शेती पंप उघडे पडले. शेतामध्ये असणाऱ्या पिकांसाठी तसेच झाडांसाठी पाणी आवश्यक असल्याने कित्येक शेतकरी हे विद्युत पंप गुंजवणी धरणाच्या पाण्यात टाकतात. पण कोणतीही काळजी न घेता धरणाच्या पाण्यामध्ये उतरत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.