

संजय गडदे, साम टीव्ही
गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक ५४ मधील नागरी प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अंकित सुनिल प्रभू थेट मैदानात उतरले आहेत. महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामांचा दर्जा, कामांची गती आणि नागरिकांना होत असलेला त्रास याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात पांडुरंग वाडी येथील रोड क्रमांक १ ते ५, उमिया माता मंदिर परिसर तसेच सेंट थॉमस परिसरातील रस्त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. रस्त्यांची दुरवस्था, मोठे खड्डे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.नगरसेवक अंकित प्रभू यांनी रस्त्यांचे सिमेंटीकरण, ड्रेनेज लाईनची कामे आणि पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कामे दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देत, निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आवश्यक ठिकाणी मॅनहोल बसवणे, सुरक्षा जाळ्या लावणे आणि गतिरोधक उभारणे, तसेच रस्त्यांचा योग्य उतार व पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रत्येक तांत्रिक बाब काटेकोरपणे तपासण्याचे आदेश देण्यात आले.
पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेण्यात आल्या असून, त्या रस्ते बांधणीच्या आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देश नगरसेवक प्रभू यांनी दिले. या दौऱ्यात महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता (AE) हर्षल खैरनार, दुय्यम अभियंता निखिल नेरकर आणि रस्ते विभागाच्या दुय्यम अभियंता प्रणाली पडवळ उपस्थित होते. तसेच विधानसभा संघटक, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवडणुकीनंतर लगेचच विकासकामांवर लक्ष केंद्रित करत “कामात गुणवत्ता आणि नागरिकांचा दिलासा” हेच आपले प्राधान्य असल्याचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.