

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त १५ मिनिटांत शक्य होणार आहे
१२ किमी दुहेरी बोगदा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली
हा १८,८३८ कोटी रुपयांचा मेगाप्रकल्प असणार आहे
मेट्रो, कोस्टल रोड आणि रिंग रोडमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार
ठाणे आणि बोरिवलीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे ते बोरिवली प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे. कारण ठाणे ते बोरीवलीदरम्यान दुहेरी बोगदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे ठाण्यावरून बोरिवलीला फक्त १५ मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. या नवीन बोगद्यांमुळे मुंबईत प्रवेश करताना ठाण्याजवळ होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे. त्याचसोबत ठाणे आणि बोरिवलीमधील कनेक्टिव्हिटी देखील चांगली होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएची बैठक झाली. या बैठकीमध्ये ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट केला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे शहर हे मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असून याठिकाणी १२ ते १३ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १२ किलो मीटर लांबीचा ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यासाठी एकूण १८ हजार ८३८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली.
ठाणे आणि कल्याण या दोन्ही शहरांचा लकवरच कायापालट होणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट केला जाणार आहे. ठाणे ‘मोबिलिटी हब’ आणि कल्याण ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या कायापालटामुळे लवकरच या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुसाट आरामदायी होईल. ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४, मेट्रो ४-ए (गायमूखपर्यंत विस्तार) आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो- ६ या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होण्यास मदत होईल. ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार २५ कोटी आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी ८८० कोटी खर्च केले जाणार आहे. यासोबतच रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी २१४ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार केला जाणार आहे. यासाठ २,५०० ते ३,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १,२३९ कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो ५, उल्हासनगर विस्तार ५-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे 'ट्रान्झिट हब' बनवले जाणार आहे. ऐरोली-काटई नाका मार्ग ५८४ कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
यासोबतच एमएमआर क्षेत्रातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.