उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे शहराच्या राजकारणातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज अखेर वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली
केवळ एक राजकारणी नव्हे, तर त्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आणि कल्पक प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुरतवाला यांची त्यांच्या दोन जिवलग मित्रांशी असलेली "दोस्ती" चे अनेक पैलू पुण्याने पाहिले. पुण्यातील राजकारणात अंकुश काकडे, गिरीश बापट आणि शांतीलाल सुरतवाला हे एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांची मैत्री मात्र सर्वश्रुत होती. या मैत्रीच्या त्रिकुटाला अनेक जणं GAS असं म्हणायचे. याचा अर्थ म्हणजे G: Girish बापट, A: Ankush काकडे आणि S: Shantilal सुरतवाला.
४ वर्षांपूर्वी पुण्याचे खासदार राहिलेले आणि भाजप चे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन झालं. २०२२ मध्ये पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गिरीश बापट यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा बापट आमदार राहिले. 2019 ला पुण्याचे खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातील त्यांच योगदान पुणेकरांच्या कायम स्मरणात राहील. राजकीय कारकीर्द सोबतच त्यांचे इतरांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सुद्धा आजही अनेकांच्या मुखी आहेत.
संपूर्ण पुणे शहरात फक्त भाजप च नव्हे तर काँग्रेस सह इतर सगळ्या राजकीय पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. यातील एक पैलू म्हणजे अंकुश काकडे. पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेले अंकुश काकडे हे पुणे शहरातील एक जुने जाणकार नेते. शरद पवारांसह पक्षातील सर्व नेत्यांसोबत त्यांचे वयक्तिक संबंध असं असलं तरी सुद्धा त्यांची आणि गिरीश बापट यांच्यासोबत सच्ची दोस्ती होती. या मैत्री मध्ये त्या दोघांनी कधीही राजकारण आणलं नाही. राजकीय मतभेद असले तरी ते तात्पुरत्या स्वरूपाचे मनभेद मात्र बिलकुल नाही.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अंकुश काकडे हळहळले आणि आसवांचा बांध फुटत असताना ते त्यावेळी म्हणाले होते, "राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावे. गढूळ राजकारणात निखळ मैत्री कशी असावी, हे बापटांनी शिकवले होते. आज शांतीलाल सुरतवला यांचं निधन झाल्यावर, भावूक झालेले अंकुश काकडे म्हणाले, माझ्यापेक्षा बापट आणि शांतीलाल हे दोघे ही वयाने मोठे होते पण तरी आम्ही समवयस्क असल्यासारखं एकमेकांशी बोलत होतो. राजकारणात मतभेद झाले पण मनभेद आम्ही कधी होऊ दिले नाहीत. बापट हे पहिल्यापासून भाजप चे, शांतीलाल हे आधी नागरी संघटना मध्ये होते त्यानंतर ते काँग्रेस मध्ये गेले आणि महापौर झाले. मी मात्र पहिल्यापासून पवार साहेबांसोबत राहिलो. पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही मैत्रीत राजकारण आणलं नाही.
निर्मळ मनांची पण तितकीच परखड माणसं, निस्पृह राजकारणी आणि संपूर्णतः "सार्वजनिक पुणेकर" अशी या तिघांची ओळख. पुण्यातील अनेक ठिकाणी हे तिघे एकदा एकत्र बसले आणि त्यांच्यासोबत कोणी ही सामान्य पुणेकर असो किंवा मोठा नेता समस्त पुण्याचा इतिहास, भूगोल तसंच राजकीय, शासकीय, कला संस्कृती या सारख्या विषयांवर या गप्पा अगदी ४,५ तास चालत असे.
पुण्याच्या बाबत कुठला ही प्रश्न असूद्या किंवा समस्या पुणे या तिघांच्या अंगात पुरेपूर पाझरलेलं. या तिघांसोबत गप्पांचे फड कोणी अनुभवले असतील तर ते कधी ही विसरले जाऊ शकणार नाहीत. पुण्यातल्या सार्वजनिक आयुष्यातले किस्से याचा ढीगभर संग्रह या तिघांकडे असे. शहरातील समस्यांच्या बाबत बापट, शांतीलाल सुरतवाला हे नेहमी स्पष्ट आणि परखड भूमिका मांडत असे आणि आजही अंकुश काकडे यांच्याकडे चोखंदळ पुणेकर असल्याने आज आजही ते शहराच्या बाबत काही प्रश्न आला तर रोखठोक मतं व्यक्त करतात.
पुण्यातील गाजलेल्या या मैत्रीच्या त्रिकुटातून, आधी बापट आणि आता सुरतवाला निघून गेले. मैत्री, संवाद आणि सामाजिक जबाबदारी जाणीव निर्माण करून देणारे हे त्रिकुट सच्च्या पुणेकरांच्या ओठी कायम राहील यात शंका नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.