
गिरीश कांबळे, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांचा मोर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. विशेष म्हणजे आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे असणार आहे. महायुतीनेही आगामी मुंबई महपालिकेकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. या आगामी मुंबईच्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. या बैठकीनंतर मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या मुंबईतील माजी आणि आजी आमदार, खासदार नगरसेवक यांची महत्वाची बैठक रामटेक येथे झाली. या बैठकीला शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीला शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, राहुल शेवाळे, दिपक केसरकर उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबईतील माजी नगरसेवक आणि माजी आमदारही दाखल झालेले होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, 'मुंबईमध्ये आताच झालेल्या निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाला. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल. आम्ही त्या तयारीला सुरुवात केली. मुंबईत अडीच वर्षात काम केलं. खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य असे सगळं डीप क्लीन ड्राईव्ह, बाळासाहेब दवाखाना, पालिकेतर्फे सुरू केलेल्या योजना याबाबत निर्णय घेतले. बंद पडलेले प्रकल्प सुरू करणे, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून काम झाली नाही, आम्ही ती अडीच वर्षात निर्णय घेतले'.
'महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय घेतला. मुंबई आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पॉवर हाऊस झालं पाहिजे. मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी बैठक घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत कामाची पोचपावती मिळाली. त्या कामावर लोक लक्षात ठेवत पालिकेत महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
'आम्ही महायुती म्हणून 227 वॉर्डमध्ये तयारी करणार आहोत. मुंबईचा विकास करणे हा आमचा अजेंडा आहे. मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष खड्ड्यातून प्रवास टाळण्यासाठी दोन फेजमध्ये निर्णय घेतला. मेट्रोची, कोस्टल, अटल सेतू ही काम लोक पाहत आहे. सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही. त्यांनी लोकसभेच्या निवडणूक झाल्यावर हुरळून गेले की विधानसभेचे मंत्रिमंडळ सुद्धा तयार केलं. मुंगेरी लाल के हसीन सपने पाहायला मिळालं. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत, असा आशावाद एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
'आमच्या वैचारिक भूमिका आमच्या युतीत एक आहे. आम्ही 2022 मध्ये निर्णय घेतला आणि सर्व सामान्यांच्या सरकार आलं. आमच्या काही जागा किरकोळ मतांच्या फरकाने पडल्या. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला, त्याला मुंबईत आणण्याचं काम आपल सरकार करणार आहे, असे शिंदे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.