
Eknath shinde and anandraj ambedkar alliance : राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग रंगणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०११ साली बाळासाहेब ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली होती. काही वर्षांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली होती. मात्र, निवडणुकीआधी युती तुटली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याचा राजकारणात शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग होऊ पाहत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या हातमिळवणीने कोणाला किती फायदा मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदा जिंकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करून सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थान मानणारा रिपब्लिकन पक्ष अनेक गटात विखुरला गेला आहे. शेकडो रिपब्लिकन गटांपैकी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्या गटाचा दलित मतांवर मोठा प्रभाव आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या नावाने नवा प्रयोग सुरु केला आहे. मागील काही निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला रिपब्लिकन पक्षाच्या गटांपेक्षा अधिक मते मिळवण्यात यश मिळालं.
वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत दलित मतांवर प्रभाव असलेल्या राजकीय पक्षांना फारशी चांगली कामगिरी करता आली नसल्याचं दिसून आलं. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार जिंकला नाही. तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र,आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी ५० हजार मतांनी पराभव केला. आनंदराज आंबेडकर यांना फक्त १८७९३ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर स्मारकासाठी लढा देणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांची जादू चालली नव्हती.
जोगेंद्र कवाडे यांच्या गटाने दोन वर्षाआधी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यानंतर आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची शिंदेंना साथ मिळाली आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भाजपशी हातमिळवणी कायम आहे. दलित मतांवर प्रभाव असणारे राजकीय पक्ष महायुतीकडे झुकल्याचे दिसत आहे. आनंदराज आंबेडकर यांना मानणारा वर्ग मुंबईतही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो. दुसरीकडे दलित, बहुजन मतांना वळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्या या युतीचा कोणाला किती फायदा होईल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.