मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे. संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची भावना होती. सरकार त्यांच्या विचारावरच चालतं आहे, असं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics News)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. डॉ. आंबेडकरांच्या घटनेने सगळ्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आज मुख्यमंत्री झाला आणि राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळेच, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'महापुरुष इतिहास घडवतात, पण बाबासाहेबांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांना दिलासा देऊन इतिहास बदलला. आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी दीनदलितांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी जगभरातल्या शोषित, पीडितांच्या हक्कांना, वैचारिक संघटनात्मक बळ दिलं. संघटित होण्याचं बळ त्यांनी दिलं. दलित बांधवांच्यातल्या आत्मविश्वासाचं सगळं श्रेय फक्त बाबासाहेबांनाच आहे'.
'इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल'
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी केली तसंच आढावा घेतला आहे. आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा निर्धार केला आहे. राजगृह हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो जोपासला जाईल. लोअर परेल इथल्या स्मारकाची पाहणी केली जाईल, बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईल, असं शिंदे म्हणाले.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.