मुंबई: गुरुवारी ३० जूनला राज्याच्या राजकारणाने १८० डिग्री यू-टर्न घेतला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. याबाबत भाजपच्या राष्ट्राय कार्यकारणीही स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. राज्याच्या राजकारणाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची हैदराबादमध्ये आज, शनिवारी बैठक होत आहे. या बैठकीसाठी भाजपचे राज्यातले नेते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतले सदस्य हैदराबादमध्ये येत आहेत. (Devendra Fadnavis Latest News)
हे देखील पाहा -
भाजपच्या या बैठकीला आज, शनिवारपासून सुरुवात होत असली तरी अनेक भाजप नेते हे शुक्रवारीच हैदराबादमध्ये दाखल झाले. यावेळी भाजप नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त चर्चा होती अशी माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने ते नाराज असल्यांची चर्चा आहे. फडणवीसांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने महाराष्ट्रातील भाजप नेते नाराज आहेत. याबाबत भाजपच्या बैठकीआधीच फडणवीसांच्या नाराजीबद्दल चर्चा होत होती. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी यांना बैठकीच्या ठिकाणी फडणवीसांच्या नाराजीवरच प्रश्न विचारण्यात आले.
हैदराबादमधील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचीच जास्त चर्चा असल्याने पक्षालाही याची दखल घ्यावी लागली. याबाबत सी.टी. रवी म्हणाले की, "आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ता आहोत. पक्षानं दिलेल्या निर्देशांचं आम्ही पालन करतो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (जेपी नड्डा) यांनी ही सूचना केली होती. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा आदर करतो. फडणवीस देखील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षाच्या निर्देशांचं पालन केलं आहे. आम्ही लहान मोठा असा फरक करत नाही." असे रवी यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल यामध्ये कोणतीही शंका नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
यावरुन भाजपमध्ये सगळं आलेबल आहे असं दिसत असलं तरी महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या फडणवीसांना डावललं गेल्याने भाजप आमदार आणि फडणवीस समर्थक नाराज आहेत. केंद्राने फडणवीसांच्या खच्चीकरणासाठी असं केलं का? असा सवाल भाजप कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर बसून मविआ सरकारच्या नाकी नऊ आणले. मविआ सरकारला त्यांनी नेहमीच धारेवर धरलं. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगून भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने फडणवीसांची ताकद कमी करत मोठी रिस्क घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही त्यांनी ट्विटरवर आपलं बायो हे 'महाराष्ट्र सेवक' असं ठेवलं आहे. त्यांनी 'उप-मुख्यमंत्री' असं ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांणा अधिक उधाण आलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.