संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: दुचाकी चोरी करून त्यांचे सुटे भाग विकणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीच्या ८ मोटारसायकली तसेच २४ मोटारसायकलींच्या नंबर प्लेट, चेसिस, इंजिन आणि इतर सुटे भाग जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे उत्तर मुंबईतील दुचाकी चोरीची आणखी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत.
दहिसर पूर्व परिसरातील देसाई चाळ, शिववल्लभ रोड, अशोकवन येथे पार्क केलेली हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH 02 AZ 4549 २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २१ ऑगस्ट रोजी रात्री ९ या कालावधीत चोरीला गेली होती. याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे तीन संशयित एका दुचाकीवरून चोरीची दुचाकी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या मार्गाचा माग काढत दुचाकी दहिसर पूर्वेतील साईबाबा मंदिर रोड परिसरात पार्क केल्याचे शोधून काढले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आनंदनगर परिसरातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी चोरीच्या वाहनांवर लक्ष ठेवून संधी साधत असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या दुचाकींपैकी काही वाहने एका व्यक्तीला विकली जात होती. संबंधित व्यक्ती चोरीच्या वाहनांचे पूर्णपणे सुटे भाग करून ते भंगारामध्ये विकत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या व्यक्तीच्या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोटारसायकलींचे भाग जप्त केले.
या कारवाईत दहिसर पोलिस ठाण्यातील चार, एमएचबी पोलिस ठाण्यातील दोन, कस्तुरबा पोलिस ठाण्यातील एक आणि मालवणी पोलिस ठाण्यातील एक, अशा एकूण आठ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. तपासादरम्यान आठ मोटारसायकली तसेच २४ मोटारसायकलींच्या नंबर प्लेट, चेसिस, इंजिन व इतर पार्ट्स हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोनित भास्कर शेट्टी (२३), पंकज संगलप्रसाद गुप्ता (२०), आशुतोष संतोष दुबे (२०) आणि पिंटू छोटेलाल गुप्ता (२९) यांचा समावेश आहे. पिंटू गुप्ता हा चोरीच्या वाहनांचे पार्ट्स करण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय एका १७ वर्षे ८ महिन्यांच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलिस आयुक्त शशिकुमार मीना, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त जयराज रणवरे तसेच दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत गीते आणि त्यांच्या पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.