Pune Dagdusheth Ganpati: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी त्याच परिसरात असणाऱ्या फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्याची जागा ट्रस्टला हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबत पुणे पोलिसांनी या प्रस्तावाला तत्त्वतः 'ना हरकत' मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासाठी नवीन आधुनिक पोलिस इमारतीची उभारणी, सर्व पोलिस कार्यालयांचे स्थलांतर करणे आणि त्यानंतरच या जागेचा ताबा ट्रस्टकडे देणे अशा महत्त्वाच्या अटी आणि शर्ती यामध्ये लिहिण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.
"आमदार झाल्यावर या गोष्टीचा पाठपुरावा मी करत होतो. मंदिरात दर्शनाला येण्यासाठी मोठी गर्दी होती. पुणे पोलिसांकडून तत्वतः ना हरकत पत्र गृह विभागाला पाठवलं आहे. या पत्रावर आता मंत्रालयात पाठपुरावा केला जाईल आणि त्यानंतर संबंधित जागा दोन्ही पोलिस ठाण्यांसाठी निश्चित केल्या जातील आणि त्याचे काम होईल. हे झाल्यावरच श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या विस्ताराच्या कामाची सुरुवात होईल अशी माहिती," श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी दिली.
पुण्यातील एकाच इमारती मध्ये फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाणे यासह दोन वाहतूक विभाग, सहाय्यक पोलिस आयुक्त, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त अशी अनेक कार्यालये कार्यरत आहेत. १९७६ पासून दगडूशेठ मंदिराच्या बाजूला ही इमारतीत उभी आहे. गणेशोत्सव, चतुर्थी, अन्य महत्वाचे सण या दिवशी मोठी गर्दी तिथे होत असते. यासह एरवी सुद्धा मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा मोठी असल्याने परिणामी गर्दी आणि वाहतुकीवर ताण येतो. वाढती भाविक संख्या, सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर विस्ताराच्या दृष्टीने ट्रस्टने ही जागा शासनाकडे मागितली होती.
२ पोलिस ठाण्यांना लवकरच नवीन जागा मिळणार
सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार, पोलिस फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांना बुधवार पेठेतील महापालिकेची सिटी सर्व्हे क्रमांक १११२ व १११३ मधील जागा प्रथम पोलिस विभागाच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी. या प्रस्तावित जागेवर वाहतूक विभागाची चौकी तसेच पोलिस अधिकार्यांच्या कार्यालयांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज ही वास्तू उभारण्यात यावी असं सुद्धा म्हटलं आहे. या इमारतीच्या उभारणीचा खर्च दगडूशेठ ट्रस्ट किंवा गृह विभागाने करावा, तसेच विद्यमान शासकीय जागेची किंमत ट्रस्टकडून शासनाला अदा करण्यात यावी, अशी महत्त्वाची अट प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे.
नवीन इमारत पूर्ण झाल्यावरच जागेचा ताबा
प्रस्तावित जागेवर नवीन पोलिस संकुल तयार होऊन सर्व कार्यालये तेथे स्थलांतरित होईपर्यंत आहे त्याच ठिकाणी पोलिस विभागाचे सर्व कामकाज सुरू राहणार आहे. शहरात पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोणतेही कार्यालय तत्काळ स्थलांतर करण्यात येणार नसल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे. नवीन संकुल तयार झाल्यानंतरच विद्यमान इमारतीचा ताबा मंदिराच्या ट्रस्टकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाढत्या कामकाजाच्या तुलनेत उपलब्ध जागा कमी पडत असल्याने आधुनिक पोलिस संकुलाची गरज या प्रस्तावात अधोरेखित करण्यात आली आहे.
जागा किती मिळणार?
विद्यमान इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे २२ हजार चौरस फूट आहे. प्रस्तावित महापालिकेची जागा सुमारे ७५९ चौरस मीटर असून ३.५ एफएसआयमुळे सुमारे २८ हजार चौरस फूट बांधकाम करता येणार आहे. सध्याची पोलिस जागा ८६३ चौरस मीटर असून विद्यमान इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे २२ हजार चौरस फूट इतके आहे. तसेच ही जागा सध्याच्या जागेपासून अवघे ३०० मीटर अंतरावर आहे. नव्या जागेवर अधिक प्रशस्त आणि आधुनिक पोलिस संकुल उभारणे शक्य होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.