
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : राज्यात यंदा मे महिन्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे विविध शहरातील सखल भागात पाणी साचत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वर्षी लवकर मान्सून सुरु झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच मुसळधार पावसानंतर पवईतील रस्त्यावर मगरीचा वावर पाहायला मिळाला. या मगरीचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरात मगर मुक्त संचार करताना आढळून आली आहे. पवईत मंगळवारी रात्री साधारण सहा फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. यामुळे आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन घडणे हे आता नवीन नाही.
पवई तलावाला लागूनच आयआयटीचा परिसर आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत पवईच्या रस्त्यांवर आता मगरीही मुक्तसंचार करु लागल्या आहेत. पवई आयआयटीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास लेक साईट परिसरात येथे एक मगर रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले. मगर रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, काही वेळाने मगर पुन्हा तलावात निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
व्हायरल होणारा व्हिडिओ पवई आयआयटीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये अंदाजे ६ फूट लांब रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसत आहे. मुसळधार पावसानंतरच मगर रस्त्यावर संचार करत असल्याचे दिसत आहे.
मगर रस्त्यावर संचार करताना आजूबाजूला कोणीच दिसत नाही. ही मगर सुरुवातीला रस्त्यावर संचार करते. त्यानंतर तलावाजवळ जाते. थोड्यावेळाने ही मगर थेट तलावात निघून जाते. या मगरीचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. मगरीचा हा व्हिडिओ 'आयआयटी बॉम्बे' नावाच्या युट्यूब चॅनेलवरूनही शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे पवई आयआयटी मुंबईत मगर आढळल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.