
नितीन पाटणकर, साम टीव्ही
पुणे : नागपुरातील राजभवनात महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे दिसून आलं. दुसरीकडे शिंदे सरकारमधील १० हून अधिक जणांचा पत्ता झाल्याचे दिसून आले. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात आरपीआय पक्षाला स्थान मिळावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला मंत्रिपदासहित शपथविधीचं आमंत्रणही मिळालं नव्हतं. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठवले यांची माफी मागितली.
नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात पोहोचले. चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. काल मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बावनकुळे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. पुणे विमानतळावर आल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्या नाराजीवर भाष्य केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील'.
'मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितल्यानंतर रामदास आठवले यांची नाराजी दूर होणार का, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.