
परभणी : परभणी मराठवाड्यातील महत्वाचं शहर आहे. झालेला प्रकार निंदनीय आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. आंदोलकांकडून अशा संतप्त प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहेत, अशी प्रतिक्रिया रिपाईचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. परभणी शहरात बंद दरम्यान आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
परभणीच्या पूर्णा ताडकळस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरील संविधानाच्या प्रतिमेचा अपमान केल्याबद्दल परभणी जिल्ह्यात आजया घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर ताडकळस येथे धानोरा टी पॉइंट पोलीस स्टेशनच्या समोर निषेध रॅली काढत रस्तारोको करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अज्ञात इसमाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले. त्यानंतर परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली होती. बंद दरम्यान आंबेडकरी अनुयायांनी रस्तारोको करत काही भागात दगड फेक केली. तसंच टायर जाळले. यावेळी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर होते.
त्यानंतर या रेल्वे स्टेशन परिसरात देखील बाहेर तीन ठिकाणी ठेवलेले पाईप पेटवून देण्यात आले. त्यामुळे या भागातील वीज बंद करण्यात आली आहे. यावेळी महिलांच्या जमावाने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील तोडफोड केलेली दिसून आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात येत आहेत. यावेळी जमावाकडून देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
शहरात सात ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या. त्यानंतर जमावाचा आक्रमकपणा बघून पोलीस मागे फिरले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीसांकडून सतत अश्रुधुराच्या नळकंड्या पोलिसांकडून फोडल्या जात आहेत. सध्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक याठिकाणी मागवण्यात आली आहे.
दरम्यान, याबद्दल रामदास आठवले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कोणी माथेफिरूने संविधान आणि बाबासाहेब यांचा अपमान केला. आरोपी पकडला मात्र त्याच्या मागे कोण आहे का याची चौकशी व्हावी याची मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना करणार आहे. मी आंबेडकरी अनुयायांना आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी. झालेला प्रकार निंदनीय आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. यामागे ज्याचा हात असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकाराची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील हा विश्वास आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील या बद्दल ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलं आहे की, वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.